संस्कार वर्गाच्या माध्यमातून भारतीय पक्षांची शाळा

शाहूपुरीत संस्कार वर्गाच्या माध्यमातून भारतीय पक्षांची शाळा

राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा या सामाजिक संस्थेच्या वतीने गेली १६ वर्षे सातत्यपूर्ण रितीने संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते.या संस्कार वर्गात मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच जगण्याचे ज्ञान देण्यासाठी अनेकविध विधायक उपक्रम राबविले जातात.याचाच एक भाग म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत पक्षांसाठी खाऊ व पाणी ठेवून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले जाते.प्रतिवर्षी या उपक्रमात अनेक आजी- माजी विद्यार्थी सहभागी होऊन पशुपक्षांविषयीचे आपले उत्तरदायित्व निभावण्याचा प्रयत्न करतात.

यावर्षीही या मुलांनी आपापल्या घराच्या परसबागेत या पक्षांसाठी खाऊ व पाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे.

याला पक्षांकडूनही पूर्णपणे निर्भय वातावरण मिळाल्याने अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.अनेक प्रकारचे पक्षी उदा.पोपट,मैना,चिमण्या, बुलबुल,पारवे, खारुताई व अनेक रंगीबिरंगी छोटे पक्षी आवर्जून भेट देऊन आनंदाने आपला खाऊ खाऊन,पाणी पिऊन जातात.हे पक्षी पिण्यासाठी म्हणून जी पाण्याची भांडी ठेवलेली असतात त्यात मनसोक्त आंघोळीचीही मजा लुटताना दिसतात.निसर्गाचा हा आविष्कार पाहिल्यावर जणूकाही पक्षांची शाळाच भरल्याचा भास निर्माण होत आहे.