शाहूपुरी विद्यालयात ३० वर्षांनी रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

शाहूपुरी विद्यालयात ३० वर्षांनी रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

येथील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात ३० वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.

सन १९९५ सालच्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांनी आज आपल्या शाला माऊलीच्या प्रांगणात आपले पाऊल ठेवून मातृसुखाचा आनंद लुटला.

तत्कालीन परिस्थितीत अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत वाढलेली आम्हा सारखी सर्वच मुले आज दहेज- गुजरात , मुंबई,पुणे व सातारासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी शिक्षणाच्या बळावर सुस्थितीत आपले जीवन व्यतीत करीत आहेत हे याच शालामाऊलीच्या व गुरुजनांच्या श्रमाचे व आशिर्वादाचे फळ असल्याच्या भावना महेश अहिरे,नवनाथ माने या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी सर्वांनी एकत्रित मिळून विद्यालयात आयोजित केलेल्या आठवडा बाजार या उपक्रमात सहभाग घेत भाजीपाला खरेदीचा आनंद घेतला.तद्नंतर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटून सर्वांशी आपुलकीने संवाद साधला.

यानंतर झालेल्या भावपूर्ण कार्यक्रमात दीक्षित पी.के.यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी महेश अहिरे व नवनाथ माने या दोहोंची आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.                                                          याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारत भोसले यांनी विद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम संस्था व विद्यालय या दोहोंच्या पातळीवर कायमस्वरूपी संस्मरणीय राहील असाच असून आयुष्याच्या वाटेवरुन पुढें-पुढें जात असताना आपल्या व्यापातून सवड काढून ३० वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर आपण सर्वजण  आपल्या शालामाऊलीच्या प्रांगणात आवर्जून आठवणीने आलात हा क्षण आमचेसाठी खूप अनमोल असाच आहे.भविष्यातही ही नाती अशीच चिरंतन राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया असे आवाहन केले.यावेळी सर्वांनी मिळून सर्व शिक्षकांचा हृद्य सत्कार केला.

संजय बारंगळे यांनी आभार मानले.

सर्व माजी विद्यार्थी बॅच -१९९५.

आपणांस खूप खूप शुभाशीर्वाद.

शनिवारी आपण सर्वजण पहिल्या बॅचचे विद्यार्थी आपल्या शालामाऊलीस भेटण्यासाठी आवर्जून आलात,खूप आनंद वाटला.

बघता बघता ३० वर्षे कशी निघून गेली हे कळलेच नाही.बरेच काही बदलून गेले आहे.आपण सर्वजण,आपली प्रापंचिक परिस्थिती, विद्यालय आणि त्याचे स्वरूप.परंतु,मुलांनो एक गोष्ट मात्र बदलली नाही व पुढेही बदलणार नाही ती गोष्ट म्हणजे माझ्या मनात असलेले तुम्हा सर्वांचे स्थान.आपणांस कदाचित खरे वाटणार नाही परंतु, आपल्या सर्वांच्या आठवणीं शिवाय एक दिवसही जात नाही.

विद्यालयाच्या उभारणीचा प्रारंभीचा काळ खूप अडीअडचणींचा होता.विद्यार्थी प्रवेश,आर्थिक समस्या, शिक्षकवर्ग, इमारत उभारणी व या सर्वातून इयत्ता १० वीचा निकाल लावण्याचे शिवधनुष्य पेलणे या सर्व बाबी अवघड होत्या.परंतु, ग्रामीण भागातील जनतेची, शेतकऱ्यांची, श्रमजीवी, कष्टकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत हा उदात्त हेतू मनी ठेवून आरंभीलेले हे कार्य होते.त्यामुळे दु:खदायक मानसिक परिस्थितीत सुध्दा मोठ्या जिद्दीने कार्यरत राहिलो.यासाठी आपणा सर्वांचे पाठबळही खूप लाभले हेही तितकेच महत्त्वाचे.

अगदी स्वतःला,प्रपंचाला विसरून आपणासाठी रात्रंदिवस झपाटलेल्या अवस्थेत कर्तव्य पथावरुन चालत राहिलो.यांतून मी कमावली ती माणसांच्या स्वरुपातील संपत्ती.तुम्ही,तुम्हा सर्वांचे पालक,आठही वाडीतील सर्वसामान्य जनता यांनी मला खूप आपुलकी, प्रेम,आदर दिला आणि याच गोष्टी माझ्यासाठी आयुष्याच्या काटेरी वाटेवरुन चालताना जगण्याचे बळ बनल्या.आजही ज्या ज्या वेळी मी तुमच्या घरासमोरुन वाडी-वस्तीत काही कारणाने जातो तो दिवस माझ्यासाठी परमोच्च सुखाचा असतो.

आपण शनिवारी आलात कदाचित आपल्या दृष्टीने हा प्रसंग साधा असेल परंतु,या शाला माऊलीच्या आयुष्यातील मात्र तो ३० वर्षांनंतर आलेला खूप – खूप सुखद असा क्षण होता.मुलांनो,भविष्यात असेच ऋणानुबंध जपूयात.तुम्ही कोठेही असा, यापुढील जीवनात कदाचित तुम्हाला आनंदा बरोबरच निराश करणारे क्षण सुद्धा येतील त्यावेळी विचलित न होता धीराने, संयमाने सर्व संकटांचा सामना करा.लक्षात ठेवा, संकटे भित्री असतात.आपण पाठ फिरवली की ती जास्तच भिती दाखवतात व त्यांचा धैर्याने मुकाबला केला की,ती पळून जातात.मला विश्वास आहे की ,तुम्ही संघर्ष योध्याच्या  भूमिकेत राहून स्वतः व स्वतःच्या परिवारास सुखी ठेवाल.  यापुढील उर्वरित आयुष्यात आपणांस व आपल्या परिवारास निरोगी दीर्घायुष्यासह सुख-समाधान व शांती लाभो हीच आई श्री तुळजाभवानी चरणी प्रार्थना!…