शाहूपुरीत भरली बाल व्यापा-यांची मंडई

शाहूपुरीत भरली बाल व्यापा-यांची मंडई

राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालय परिसरात संस्कार वर्गचा भाग म्हणून आज बाल व्यापा-यांनी मंडई फुलून गेली होती.

मुलांना या खरेदी विक्री व्यवहारातून गणिती ज्ञान, व्यवहार ज्ञान व्हावे.त्यांच्यातील व्यवसाय कौशल्ये वाढीस लागावी या हेतूने आठवडा बाजार संकल्पना राबविली गेली होती.या आठवडा बाजारात अनेक बाल शेतकरी,भाजी विक्रेते, खाद्य पदार्थांचे स्टॉल धारक सहभागी झाले होते.

यावेळी खरेदीसाठी आलेले पालक नागरिक आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी हे बालविक्रेते आपापल्या परीने गि-हाईकांना आपला माल कसा चांगला आहे हे पटवून देत असताना “अहो,मावशी ताजी मेथी १५ ला दोन, चवदार आळू, शेवगा घ्या!” या वाक्याने आपण खरोखरच भाजी मंडईतील विक्रेत्यांसमोर उभे राहिल्याचा भास ग्राहकांना होत होता.

या मंडईत मेथीसह,पालक,शेवगा,वांगी, ढब्बू मिरची,भेंडी,दुधी भोपळा,बिट,कांदा,हिरवी मिरची,काकडी,लसुण,आळूची पाने,टोमॅटो,शेपू,बटाटे,आले लिंबू,आवळे,चिंचा,कैरी, कलिंगड तसेच, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर विविध प्रकारच्या भेळ, पाणीपुरी,कलिंगडाच्या फोडी,सरबते,सामोसा, इडली चटणी, इडली सांबार,मोमोज,ब्रेड पॅटीस,चहा,फ्रूट सॅलेड,कपकेक,चिरमुरे गोड लाडू,भडंग,स्विट कॉर्न चॅट,कैरी चॅट,केळी व पेरु चॅट,मंच्युरियन,तळलेले नाचणीचे पापडांसह अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल होती.

या आठवडा बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयाच्या सन १९९५ सालीच्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा या उपक्रमास आवर्जून भेट देत खरेदीचा आनंद लुटला.