मकर संक्रांती सणानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना भारत भोसले यांनी “स्री ही शक्तीचे प्रतीक असून संपूर्ण विश्वासाठी ती उर्जा,प्रेरणा असते.परंतु, तरीही बहुतांश महिला या अजूनही उपेक्षितच असल्याचे चित्र दिसून येत असून विधवा महिलांचा सन्मान,स्री भ्रूणहत्या विरोध, घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणास वैचारिक दृष्टिकोनातून प्रतिबंध घालणे, स्वतःचे आरोग्य सांभाळून कुटुंब व्यवस्था आनंदी ठेवणे,नवपिढी सुसंस्कारांनी घडविणे या सर्व मुद्यांना आपल्या जीवनात महिलांनी अनन्यसाधारण महत्त्व दिले तर उद्याचा समाज नक्कीच आदर्शवत बनेल.हा कार्यक्रम हा नुसता हळदीकुंकू समारंभ नसून तुमच्यातील ‘आई’ नावाच्या व्यक्तीरेखेला नवसमाज निर्मितीसाठी साद घालण्याचा अल्पसा प्रयत्न आहे.चांगल्या विचारांची साखळी आपण जर निर्माण करु शकलो तर ‘मानवतेचे सूंदर मंदिर ‘ उभे राहण्यास ख-या अर्थाने हातभार लागेल ” असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सौ.निर्मलाताई दुधाणे,सौ.शोभिताई केंडेंसह उपस्थित महिलांनी उत्स्फूर्तपणे याविषयीच्या आपल्या भावना मनोगतातून व्यक्त करीत वरील भूमिकेस आपला पाठींबा दर्शविला..
यानंतर झालेल्या कार्यक्रमात महिलांनी उखाणे व संगीतखुर्ची स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटला.या स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.निर्मलाताई दुधाणे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.शोभाताई केंडे,सौ.माधवीताई शेटे, शाहूपुरी विद्यालयाच्या शालाप्रमुख सौ.एस.एस.क्षिरसागर यांचे शुभहस्ते पारितोषिक म्हणून साड्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.क्षिरसागर एस.एस.यांनी केले तर सूत्रसंचलनासह आभार सौ.निंबाळकर पी.एस.यांनी मानले. या आनंददायी सोहळ्याचे संपूर्ण नियोजन शालाप्रमुख सौ.क्षिरसागर एस.एस.,सौ.निंबाळकर पी.एस.,सौ.देसाई जी.जे.व सहकारी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अगदी नेटकेपणाने केले होते.