शिवजयंती महोत्सव शाहूपुरी-२०२५

शाहूपुरीत शिवकालीन वेशभूषा स्पर्धेद्वारा अवघी शिवसृष्टी अवतरली

शिवजयंती महोत्सव, शाहूपुरी २०२५ निमित्ताने १३ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या शिवसप्ताहांतर्गत सोमवारी शिवकालीन पर्वातील असलेल्या वेशभूषेवर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉसाहेब,महाराणी सोयराबाई,महाराणी सईबाई,महाराणी येसूबाई,महाराणी ताराबाई, राणूआक्का,मावळा,बडी बेगम,आदींच्या वेशांत स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे संपूर्ण वातावरण शिवमय होऊन शाहूपुरीत अवघी शिवसृष्टी अवतरली असल्याचा भास निर्माण झाला होता.

वक्तृत्व, निबंध, डोंगर चढणी, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांमुळे निर्माण झालेल्या चैतन्यमय वातावरणात या शिवकालीन वेशभूषा स्पर्धेमुळे अधिकची भर पडून मंगळवारी दुपारी तीन वाजता संपन्न होणाऱ्या शिवचरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धेमुळे या चैतन्यदायी महोत्सवाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल असा विश्वास आहे.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शुभहस्ते शिवप्रतिमा व शिवपालखीचे पूजन…

———————————

शिवजयंती महोत्सव शाहूपुरी -२०२५ च्या निमित्ताने आज मारुती मंदिर गेंडामाळ नाका शाहूपुरी येथे आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले ( सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर) यांचे शुभहस्ते शिवप्रतिमा व शिवपालखीचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी मा.नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शुभहस्ते गेले आठवडाभर आयोजित करण्यात आलेल्या शिवसप्ताहांतर्गत शिवचरित्रावर आधारित घेतलेल्या किल्ला बांधणी स्पर्धा,वक्तृत्व, निबंध डोंगर चढणी प्रश्नमंजुषा स्पर्धा व शिवकालीन वेशभूषा स्पर्धा तसेच, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.यावेळी, लेझीम पथक, झांज पथक, अश्वारूढ मावळे,ढोल,ताशा,तुतारीच्या निनादात शिवपालखीची शाही मिरवणूक गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक अशी काढण्यात आली.सदर मार्गावरुन जागोजागी नागरिकांनी शिवप्रतिमेचे दारी सडा रांगोळी काढून व महिलांनी औक्षण करून पूजन केले.